गोवा सीमेपासून बांदा तपासणी नाकापर्यंत पथदिवे बंद…

तात्काळ दिवे सुरू न केल्यास आंदोलन करणार:मिलिंद सावंत यांचा इशारा..

⚡बांदा ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथे गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण झाली असून, गोवा राज्याच्या सीमेपासून थेट बांदा पोलीस तपासणी नाकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकातील पथदिवे पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. परिणामी संपूर्ण मार्गावर रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ बांदा उड्डाणपुलावरील काही दिवे सुरू असून उर्वरित महामार्ग अंधारात बुडालेला आहे. हे पथदिवे तात्काळ सुरु करावेत तसेच ठिकठिकाणी उभारण्यात आलेले विद्युत मनोरे तात्काळ कार्यान्वित करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी केली आहे.
हा मार्ग मुंबई–गोवा महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा आणि अपघातप्रवण भाग मानला जातो. पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वेगवान वाहने, अवजड ट्रक तसेच दुचाकी वाहनधारकांना अंदाज न आल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच पादचाऱ्यांसाठीही हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “तात्काळ पथदिवे सुरू करण्यात यावेत, अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना संबंधित यंत्रणांनी त्वरित दखल घेऊन बंद असलेले सर्व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
फोटो:-
मिलिंद सावंत.

You cannot copy content of this page