⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी तालुक्यातील पडवे धनगरवाडी येथील ग्रामस्थ महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने, ग्रामस्थांनी थेट प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.
सन २०१८ मध्ये झालेल्या वादळात धनगरवाडीतील संपूर्ण वीज पोल व वाहिन्या तुटून पडल्या होत्या. त्यानंतर दुरुस्तीच्या नावाखाली केवळ सिंगल लाईनवरून संपूर्ण वाडीला वीजपुरवठा करण्यात आला. तेव्हापासून ग्रामस्थांना सातत्याने वीज खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या तर दिवसातून केवळ एक ते दोन तासच, तेही अत्यंत कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत वारंवार पत्रव्यवहार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊनही मागील आठ वर्षांपासून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच घडले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर या समस्येला कंटाळून पडवे धनगरवाडीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी महावितरणच्या कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सादर करून, २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी बोलताना ग्रामस्थ रवींद्र शिंदे यांनी सांगितले की, “वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.” तसेच हे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनाही देण्यात येणार असून, २६ जानेवारीपूर्वी वीज समस्या न सुटल्यास संपूर्ण धनगरवाडी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून रवींद्र शिंदे, विनय शिंदे तसेच भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
सावंतवाडी येथे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देताना ग्रामस्थ.
पडवे धनगरवाडीतील वीजप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक; प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा…
