⚡मालवण ता.११-:
मालवण शहरातील वायरी ते तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका पूनम चव्हाण आणि स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत श्रमदानातून हा खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला आहे.
तारकर्ली हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मठासमोरील या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. प्रशासकीय स्तरावर कार्यवाही होण्याची वाट न पाहता जनहितार्थ नगरसेविका पूनम चव्हाण यांनी स्थानिक तरुणांना सोबत घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.
या सामाजिक कार्यासाठी अमित सावंत, उमेश जाधव, नागेश चव्हाण, अभिजित, तुषार लुडबे आणि अपर्णा सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकसहभागातून केलेल्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.
