मळगाव–ब्राम्हणपाट येथील वायंगणी भातशेती गवारेड्यांकडून उध्वस्त..

⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव–ब्राम्हणपाट येथील शेतकरी मिलिंद पंतवालावलकर यांच्या वायंगणी भातशेतीचे गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नुकतीच जोमात वाढलेली शेती गवारेड्यांच्या कळपांनी फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंतवालावलकर यांनी केली आहे.
मळगाव–ब्राम्हणपाट परिसरात शेतकरी वायंगणी भातशेतीसह वाल, चवळी, भुईमूग, मका, मुळा, लाल माठ, मिरची आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र या भागात गवारेड्यांचा उपद्रव वाढला असून, कळपाने येणारे गवारेडे शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. गवा रेड्यांच्या उपद्रवाचे हे चक्र तिन्ही ऋतूंमध्ये सुरूच असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास गवारेड्यांकडून हिसकावून घेतला जात असल्याने शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे पावसाळी भातशेतीचे नुकसान झाले असताना, दुसरीकडे काबाडकष्टाने लागवड केलेली वायंगणी भातशेती गवारेडे उद्ध्वस्त करीत आहेत. एवढे परिश्रम करूनही रानटी प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेवटी शेतकऱ्यांच्या नशिबी रडणेच येते, अशी खंत पंतवालावलकर यांनी व्यक्त केली. या गंभीर समस्येचा शासनस्तरावर विचार व्हावा, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटनांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page