जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य हवे…

पालकमंत्री राणे:जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे दिमाखात वितरण

⚡ओरोस ता ६-: जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यावर आपण जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा आणि पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातच रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातून परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या मुलांतील ५० टक्के जणांना पुन्हा जिल्ह्यात आणून रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. अवैद्य धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागलीतरी आपण मागे हटणार नाही. परंतु यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी मला साथ द्यावी. जिल्ह्याच्या विकासात चुकीचे बंद करून चांगले काम करण्यासाठी मोलाची साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन आणि पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. मंत्री राणे यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि मटका-जुगाराचे अड्डे सुरू ठेवण्यासाठी मला मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या. मात्र, नितेश नारायण राणे अशा ऑफर्सना आणि पैशांना कधीही बळी पडणार नाही. जिल्ह्याचा पालक म्हणून माझ्या जिल्ह्यातील तरुण पिढीला वाचवण्यासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही. मी पालकमंत्री असे पर्यत जिल्ह्यात अवैध धंदे सुरू होवू देणार नाही. पुन्हा ऑफर्स घेऊन माझ्याकडे आलात तर स्वतःच्या पायावर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले आहे. आज जिल्ह्यातील अनेक तरुण मोबाईलवरील ऑनलाईन बॅटिंग, मटका आणि दारूच्या व्यसनामुळे बरबाद होत आहेत. घराघरातील माता-भगिनी या त्रासामुळे रडत आहेत. जर जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही मी ही परिस्थिती बदलली नाही, तर माझ्या ‘पालक’ असण्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्यामुळेच मी ही कठोर भूमिका घेतली आहे आणि जिल्ह्यातील एकही अवैध धंदा चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
​याच कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅपही मांडला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिंधुदुर्गातील जमिनी आणि प्रकल्पांबाबत सातत्याने माहिती घेतली जात असून येत्या वर्षभरात जिल्ह्यात मोठे कारखाने येतील. २०२९ पर्यंत जिल्ह्यातील किमान ४० ते ५० टक्के तरुणांना जिल्ह्यांतच नोकऱ्या मिळतील, अशी व्यवस्था आपण करत आहोत. एका बाजूला नोकऱ्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुलांनी व्यसनात राहायचे हे चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांनी या सामाजिक लढाईत प्रशासनाला साथ द्यावी. या विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग व्हावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधू दर्पण गृहनिर्माण संस्थेला मान्यता देण्यात आली असून दोन दिवसांत भूखंड वाटप केले जाणार आहे, असेही सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी, प्रशासन आणि पत्रकार समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे घटक आहेत. सिंधुदुर्गातील पत्रकारिता सकारात्मक आहे, असे सांगितले. प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी असलेल्या मैत्रीचा फायदा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना होत असल्याचे सांगत पत्रकार भवनामध्ये असलेल्या वाचनालयाला आ निरंजन डावखरे यांनी आपले वडील कै वसंत डावखरे यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून ४० हजार रुपये किमतीची दिलेली पुस्तके पत्रकार संघाकडे सुपूर्द केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सौ साठे, डेप्युटी सी ई ओ परब यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रसन्न जोशी यांनी बदलती पत्रकारिता आणि पत्रकारांनी आपल्यात करावयाचे बदल याबाबत मार्मिक मार्गदर्शन केले.

चौकट
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवगड अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली सुधीर राणे, मालवण अर्जुन बापर्डेकर, कुडाळ प्रशांत पोईपकर, सावंतवाडी सागर चव्हाण, वेंगुर्ला प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरी लवू म्हाडेश्वर, दोडामार्ग ओम देसाई, वैभववाडी महेश रावराणे या नऊ जणांचा शाळा, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. . प्रास्ताविक खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन जेठे यांनी केले.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page