.. अन्यथा ग्रामस्थांचे 26 जानेवारी रोजी उपोषण
⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील
शिरोडा गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या टाकीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा कार्यक्षेत्रातील नळपाणी योजनाधारक व ग्रामस्थ यांच्यावतीने शिरोडा सरपंचा लतिका रेडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुरुवारी (1 जानेवारी) देण्यात आला आहे.
याबाबतचे शिरोडा सरपंचा लतिका रेडकर यांना माजी सरपंच मनोज उगवेकर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर परब, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, राजन धानजी, अर्चना नाईक आदीनी निवेदन सादर केले आहे. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे,
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिरोडा गांधीनगर, शिरोडा केरवाडा, शिरोडा वेळागर व काही अन्य भागात भीषण पाणीटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. गुळदुवे तिरोडा येथील नळपाणी योजनेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यल्प व अपुरा आहे. या भागातील पिण्याच्या व नियमित वापराच्या पाण्याची गरज पाहता तिलारी प्रकल्पाकडून येणारे पाणी पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता डोंगरीवाडी, गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या अंतर्गत पाण्याची टाकी मागील 3 वर्षापासून बांधण्यात येत असून संबंधित ठेकेदाराकडून सदरच्या टाकीचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे.येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करूनही टाकीचे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांत अत्यंत नाराजी आहे. याबाबत असलेला जन आक्रोश पाहता दि. 23 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत वतीने जिल्हा पाणी पुरवठा विभाग व तिलारी पा.पू. योजना विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत येत्या 15 दिवसात टाकीचे उर्वरित काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे.जलजिवन योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत पाणी पुरवठा सुरू न केला गेल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, शिरोडा येथे ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे,असा इशारा देण्यात आला आहे. गावातील जनतेच्या पाण्याविषयीच्या या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास जनक्षोभ उसळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.शिरोडा ग्रामपंचायत येथे सरपंच लतिका रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23 डिसेंबर रोजी झालेल्या विशेष सभेत तिलारी जल योजना अंतर्गत शिरोडा गांधीनगर येथे सुरू असलेल्या टाकीचे बांधकाम व पाईपलाइन काम संदर्भात चर्चा करण्यात आली होती. यावेळी या सभेस महाजीवन प्राधिकरण चे शाखा अभियंता श्री. कुंभार, ग्रामीण पाणीपुरवठा
शाखा अभियंता अनुप वळवी, नाबार्ड एजन्सी चे ठेकेदार विकेश सापळे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा उपअभियंता
प्रफुल्लकुमार शिंदे, बांधकाम ठेकेदार
बिपीन कोरगावकर
यांच्या वतीने टाकीचे उर्वरित बांधकाम येत्या 15 दिवसात पूर्ण करून नंतर तिलारी जलयोजना अंतर्गत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, बाबा नाईक, विजय पडवळ, माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य कौशिक परब, प्राची नाईक, स्वरूपा गावडे, तसेच संदीप गावडे, राजू आंदुरलेकर , अशोक परब, श्रीराम नाईक, उदय गावडे, दिगंबर परब, बच्चू मलबारी आदी उपस्थित होते. दरम्यान
आठवडा उलटला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी पाण्याच्या मूलभूत समस्या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
