⚡मालवण ता.०१-:
मालवण शहरातील सोमवार पेठ येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नगरसेवक मंदार ओरसकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले आहे. यामुळे बऱ्याच काळानंतर ही स्मशानभूमी आता लख्ख प्रकाशाने उजळली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी वावरताना अंधारामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन मंदार ओरसकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून येथे आवश्यक दिवे आणि विद्युत व्यवस्था कार्यान्वित केली आहे. केवळ स्मशानभूमीच नव्हे, तर दांडी आवारवाडी येथील हायमास्ट दिव्यांचे रखडलेले कामही त्यांनी विशेष पाठपुरावा करून मार्गी लावले आहे. हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांना स्थानिक कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांची मोठी मदत लाभली. यामध्ये बबन वाघ, भावेश बटाव आणि रोशन कांबळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य केले.
नगरसेवक ओरसकर यांच्या या तत्परतेमुळे आणि विकासकामांच्या धडाक्यामुळे सोमवार पेठ आणि दांडी परिसरातील रहिवाशांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
