गुरुदास गवंडे: ही बाब चिंताजनक, लवकर पोटनिवडणूक घ्या..
⚡बांदा ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ९५ ग्रामपंचायतींमधील १२५ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त असून ५ थेट सरपंच पदे रिक्त आहेत. काही ग्रामपंचायत सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी राजीनामे दिले असतानाही अद्याप त्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत, ही बाब चिंताजनक असल्याची टीका येथील सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमार्फत दोन वेळा निवडणुका घ्याव्यात, यासाठी प्रशासनाकडे अहवाल पाठवण्यात आले आहेत. मात्र तरीही निवडणुका न होणे हे लोकशाही प्रक्रियेस मारक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. याचे उदाहरण देताना निगुडे ग्रामपंचायतीतील एका सदस्याने जून २०२३ मध्ये राजीनामा दिला असून, संबंधित पद आजतागायत रिक्तच आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींची मुदत २९ डिसेंबर २०२५ रोजी संपत असून काहींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुका न घेता थेट पुढील निवडणुकांची वाट पाहिली जात असल्याने सर्वसामान्य मतदारांनी आपल्या समस्या मांडाव्यात तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरक्षण किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक अडचणी नसताना निवडणुका का घेतल्या जात नाहीत, याबाबत जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी श्री गवंडे यांनी केली. नियमांनुसार एखादे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक असताना, दोन-दोन वर्षे निवडणुका न होणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यापूर्वी गावपातळीवरील निवडणुका घेणे अधिक गरजेचे असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य पदांच्या पोटनिवडणुका घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील १२५ सदस्यांनी राजीनामे दिल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, कारण यासाठी फार मोठ्या यंत्रणेची गरज नसून एक सक्षम निवडणूक अधिकारी पुरेसा आहे, असेही श्री गवंडे यांनी नमूद केले आहे.
फोटो:-
गुरूदास गवंडे.
