वाळू डंपर अडवून खंडणी मागणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा…

शिंदे शिवसेनेची मागणी: अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा दिला इशारा..

⚡मालवण ता.२९-:
दोन दिवसापूर्वी मालवण शहरातील सागरी महामार्गावर नागरिकांनी वाळू वाहतूक करणारे डंपर अडविल्यावर ते महसूल प्रशासनाने ताब्यात घेतले असताना सदर नागरिकांनी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने बळजबरीने डंपर अडवल्याचा आरोप आज शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत वाळू वाहतूक रोखणे हे महसूल विभाग व पोलीसांचे काम असताना नागरिकांडून असे प्रकार होणे हे लोकशाहीस घातक असल्याने सदर खंडणीखोर नागरिकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मालवण तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिला.

मालवण सागरी महामार्ग येथे दोन दिवसापूर्वी काही नागरिकांनी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून अनधिकृत पणे वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप करत महसूल विभाग व पोलीसांना पाचारण केल्यावर महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी हे डंपर ताब्यात घेतले होते. याबाबत आज शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार प्रिया हरणे तसेच पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन सदर नागरिकांनी खंडणीसाठी डंपर अडविल्याचा आरोप करत कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी शिंदे शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा नगरसेवक दीपक पाटकर, मालवण कुडाळ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, पूनम चव्हाण, मेघा सावंत, नीना मुंबरकर, हरीश गांवकर, श्याम वाक्कर, राजू बिडये, भाई मांजरेकर, बाळू नाटेकर, मोहन वराडकर, शेखर गाड, नरेश हुले, किसन मांजरेकर, भाऊ मोर्जे, महेश सारंग, संदीप भोजने, तेजस लुडबे, निकित वराडकर, सुशील शेडगे, बाबा मोरजकर, आबा शिर्सेकर आदी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक दीपक पाटकर म्हणाले, सागरी महामार्ग येथून वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या डंपरना तीन नागरिकांनी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने बळजबरीने अडविले. त्यांनी चालकांजवळ खंडणीची मागणी केली. परंतू चालकांजवळ ऐवढे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी या तिनही खंडणीखोर नागरिकांनी महसुल आणि पोलिस यांनां सागरी महामार्ग येथे बोलावले. आणि अनधिकृत वाळू वाहतूक करीत असल्याचा कांगावा करून सदर गोवा पासिंग सहा डंपर महसुलकडे जमा केले वाळू वाहतूक रोखणे हे महसूल व पोलिसांचे संयुक्त कार्य आहे. मग त्यात गुंड प्रवृत्तीचे लोक गाड्या का अडवतात. दारू पिवून समाज शांतता बिघडविणे, शांतता नियमांचा भंग करणे, रात्रौ मोठमोठ्याने ओरडणे, डंपर चालकांना मारहाण करणे हे लोकशाहीस घातक आहे, त्यामुळे त्या तिन्ही व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असेही दीपक पाटकर यांनी नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सांगितले.

बळजबरीने डंपर अडवून मालवण शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणूनबुजून व राजकीय हेतूने हे प्रकार केले जात आहेत. समाज विघातक कृत्य घडविणाऱ्या त्या तीन व्यक्तींवर डंपर चालकांना धमकावणे, खंडणी मागणे, शांतता भंग करणे इत्यादी विविध कलमांअतंर्गत गुन्हे दाखल व्हावेत, जेणेकरून पुन्हा असले प्रकार शहरात होणार नाहीत. त्यासाठी जबर कार्यवाही होणे आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावर नायब तहसीलदार प्रिया हरणे यांनी सदर मागणी वरिष्ठांकडे मांडून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक हे माफिया नसून ते प्रामाणिक व्यावसायिक आहेत. कायदेशीर टेंडर घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आम्ही वाळू व्यवसाय करत आहेत. गावातील सर्व अडीअडचणींना धावून जाणारे वाळू व्यवसायिकच असतात. असे असताना वाळू वाहतूक करणारे डंपर जोरजबरदस्तीने अडविणे चुकीचे असून याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, प्रशासनाने अशा व्यक्तींवर कारवाई करावी, असे यावेळी वाळू व्यावसायिक व देवलीचे सरपंच श्याम वाक्कर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page