सिंधुदुर्गनगरी ता२९
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघामार्फत वारंवार प्रशासनाला लेखी स्वरुपात पत्रकार करून तसेच समक्ष तोंडी चर्चा करून सुद्धा अद्याप पर्यंत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला नाही. यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेली अनेक वर्ष लक्ष वेधूनही प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर दुपारी २ ते ६ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी राजाराम कविटकर, गुरुदास कुबल, वंदना सावंत, महादेव देसाई, यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनावेळी घोषणा देत उपस्थित आंदोलन करणाऱ्या शिक्षकानी आपला तीव्र संताप व्यक्त केला.
प्रमुख मागण्या
पदवीधर शिक्षकांच्या ७ व्या आयोगाप्रमाणे वेतनातील त्रुटी दूर करून कुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वेतनातील तफावत दूर करून वेतन निश्चिती करणे.
गणित व विज्ञान विषय शिक्षक पदे कार्यरत शिक्षकांमधून पदोन्नती देऊन त्यांची वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करणे.
सन २००५ पूर्वीच्या शासन अधिसूचनेनुसार रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
सन २०२२ पासूनचे प्रलंबित असलेले वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे.
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदोन्नतीने तात्काळ भरणे,
शालेय अभ्यासक्रम, तासिका, वेळापत्रक व शालेय वेळ याबाबत निर्देशानुसार तासिकेप्रमाणे शालेय वेळापत्रक निश्चित करणे.
शिक्षण सेवक कार्यकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियमित शिक्षक पदी आदेश देऊन वेतन निश्चिती करणे, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना सादर करण्यात आले.
