⚡बांदा ता.२९-: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने येथील संदीप पुंडलिक बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे राज्याध्यक्ष निलेश खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी श्री. बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. कामगारांचे हित जपणारे निर्णय घेऊन संघटनात्मक कार्य अधिक बळकट करावे व सर्व कामगार मित्रांना सोबत घेऊन संघ मजबूत करावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
नियुक्ती जाहीर झाल्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कामगार वर्गातून श्री. बांदेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाच्या जोरावर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास संघटनेच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारताना संदीप बांदेकर यांनी सांगितले की, “महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. जिल्ह्यातील कष्टकरी, वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन.”
पुणे येथे झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणीवर आनंद लाड, जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन गावडे, दिनेश तांबे, जिल्हा सरचिटणीसपदी संजय गोवेकर, जिल्हा कोषाध्यशपदी महेश राऊळ यांची निवड जाहीर करण्यात आली. केंद्रीय कार्यकारणी प्रदेश बैठकीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सचिन मेंगाळे, राहुल बोडके, सागर पवार, अमर लोहार ,उमेश आनेराव आदी उपस्थित होते.
फोटो:-
पुणे येथे नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना मान्यवर.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी संदीप बांदेकर यांची नियुक्ती…
