तहसीलदार आर. जे. पवार:अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न..
⚡देवगड ता.२८-:
आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या दृष्टीने शिक्षण न घेता समाजासाठी उपयुक्त ठरेल असे सर्वांगीण शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा एक अधिकारी आणि नागरिक या नात्याने मी व्यक्त करतो, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.
ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय, मिठबावच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ही शिक्षणसंस्था अशीच शिक्षणाची ज्योत पिढ्यान्पिढ्या उजळत राहो आणि येथील विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सेवाकालाचा उल्लेख करताना तहसीलदार पवार म्हणाले की, मला या गावात तलाठी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे पदोन्नतीच्या माध्यमातून नायब तहसीलदार व तहसीलदार या पदापर्यंत सेवा करता आली, हे मी माझे भाग्य समजतो. आज शताब्दी व अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी संस्थेने मला आमंत्रित केले, याबद्दल मी ऋणी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या शैक्षणिक कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, अध्यापक महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात शिस्त, गुणवत्ता व संस्कार यांचा आदर्श निर्माण केला आहे. येथून घडलेले शिक्षक ज्या ठिकाणी जातात, तेथे नवे शैक्षणिक आदर्श उभे करतात. संस्थेच्या पत्रव्यवहारातील तांत्रिक अडचण तत्काळ सोडविण्यास संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, मिठबाव सरपंच भाई नरे, विश्वस्त अंकुश डगरे, भीमसेन आचरेकर, भाऊ डगरे, चंद्रशेखर फाटक, धर्माजी गावकर, रामचंद्र वाळके, रवींद्र कुवेसकर, माजी सभापती भाई पारकर, आबा लोके, बी. एस. डगरे, अमोल लोके, एम. के. लोके, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले, तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक आर. आर. राऊत यांनी केले. शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती.
