मालवण सागरी महामार्गावर गोवा पासिंगचे सहा डंपर जप्त: काल रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली कारवाई..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण सागरी महामार्गावर अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करणारे गोवा पासिंगचे सहा डंपर काल रात्री तहसीलदार प्रिया परब यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल पथकाने पोलीसांच्या साथीने ही कारवाई केली. सदर सहा डंपर मध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू सापडून आली असून हे डंपर महसूल प्रशासनाने ताब्यात घेत मालवण तहसील कार्यालय आवारात आणून ठेवले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण शहराला लागून असलेल्या सागरी महामार्गावर हॉटेल आराध्य नजीक काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ६ डंपरमधून अनधिकृत गौणखनिज वाळूची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. यावेळी नगरसेवक मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व इतर स्थानिक नागरिकांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणारे हे डंपर अडवून धरले. त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिस स्थानकात दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व पोलीस कर्मचारी यांनी सागरी महामार्ग येथे धाव घेत नागरिकांनी अडविलेल्या डंपरची तपासणी केली. यामध्ये डंपर क्रमांक GA-01-T-8719, GA-09-U-0639, GA-09-U-0451, GA-08-V-1734, GA-09-U-2979 या सहा डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू सापडून आली. सध्या वाळु वाहतुक करण्याचे कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. अनधिकृतपणे वाळुची चोरी करण्याचे हेतुने वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले. सदरच्या वाहनात अनधिकृत गौण खनिज (वाळु) असल्याने त्याबाबतची माहिती पोलिसांनी तहसिलदार मालवण यांना दिली. त्यानंतर तहसीलदार प्रिया परब यांच्या मार्गदर्शनाखालील महसूल पथकाने घटनास्थळी जाऊन सहा डंपर ताब्यात घेऊन कारवाई केली. हे डंपर देण्यात आलेला असून पुढील कारवाईसाठी तहसिलदार कार्यालय मालवण यांच्या आवारात लावण्यात आलेला आहे.
