आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधण्याचा घेतलाय निर्णय..
⚡मालवण ता.२७-:
मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तिन्ही कामगारांची कुटुंबांची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील काही कामगार हे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने त्यांना घरमालकांनी खोली खाली करण्याचीही सूचना केली आहे. याबाबत कामगारांनी आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे वेधण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात ठेकेदार एजन्सीमार्फत सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांना शासनाने किमान वेतनानुसार १६ हजार रुपये मानधन निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना अनेक वर्षे फक्त १० हजार रुपये देऊन बोळवण करण्यात येत आहे. गेले चार महिने कामगारांना मानधनही देण्यात आलेले नाही. कामगारांकडून ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडूनही ठेकेदाराशी संपर्क साधण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच कामगारांना आवश्यक असणारे साहित्यही उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने कामगारांना पदरमोड करून खर्च करावा लागत आहे. तसेच कंत्राटी पद्धतीत कामगारांना पीएफ, गणवेश, ग्लोव्हज व सुरक्षा साहित्य देण्याबाबत तरतूद असताना ते देखील देण्यात न आल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला माहिती देण्यात येत असतानाही त्यांच्याकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचाही आरोप कामगारांनी केला आहे.
पगारासंदर्भात प्रशासकीय विभागांकडून सहकार्य मिळत नसल्याने तसेच किमान वेतनानुसार काम करण्यासाठी कामगारांनी आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याबाबत कामगारांनी मालवणचे नगरसेवक आणि शिंदे शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांना निवेदन सादर करून लक्ष वेधले आहे.
