⚡सावंतवाडी ता.२७-:
“गावचा सेतू गावडे आहे, गावाची नाळ गावडे आहे. गाव जोडणारा गावडे म्हणूनच ओळखला जातो. असा एकही गाव नाही जिथे गावडेचा गुंडा (दगड) नाही. अशा माझ्या गावडे समाजाच्या जी.पी.एल. स्पर्धेला उपस्थित राहून समाजबांधवांशी हितगुज साधता आले, हे मी माझे भाग्य समजतो,” असे गौरवोद्गार सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांनी काढले.
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे गावडे ब्रदर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गावडे प्रीमियर लिग (GPL) क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, वेत्ये गावचे सरपंच तसेच स्पर्धेचे आयोजक गुणाजी गावडे, जीतू गावकर, मानकरी गावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीताराम गावडे पुढे म्हणाले, “जिथे गाव तिथे गावडे अशी ओळख कोकणात आहे. गावात सलोखा राखणारा, एकोपा जपणारा, गावाचे संधान साधणारा म्हणजे गावडे. गावडे कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. तो नेतृत्व करणारा आहे. क्षत्रिय असल्याने तो लढवय्या आहे. म्हणूनच नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे गुण त्याच्या अंगी उपजत असतात. हा माझा गावडे समाज आहे आणि त्याचा मला अभिमान आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की, “या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने गावडे समाजाचा चालता-बोलता इतिहास आपल्याला समजला. सीताराम गावडे हे अमली पदार्थांच्या विरोधात निर्भीडपणे लेखन करतात. हे धाडस खरोखर वाखाणण्याजोगे आहे. अनेकजण जे बोलण्याचे टाळतात, ते काम ते ठामपणे करतात. युवकांनी अशा घातक व्यसनांपासून दूर राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात सरपंच गुणाजी गावडे यांनी स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट करत सांगितले की, “गावातील युवकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणे, त्यांच्यात संघभावना, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी होत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
गावडे प्रीमियर लिग (GPL) ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून परिसरातील अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. खेळासोबतच सामाजिक एकोपा आणि समाजबांधवांमधील नाते अधिक दृढ करण्याचे कार्य ही स्पर्धा करीत असल्याचे चित्र दिसून आले.
गावचा सेतू ‘गावडे’; गाव जोडणारा गावडे म्हणजेच गावाची नाळ-: सीताराम गावडे…
