⚡मालवण ता.२७-:
मालवण-कसाल मार्गावर चौके ते कुंभारमाठ दरम्यान आनंदव्हाळ येथे असलेल्या उतारावरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी चर खोदून ठेवल्याने हा चर वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. चढावाच्या सुरुवातीला व उतार सपल्यानंतर दोन ‘यम’ उभे करून ठेवले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
मालवण-कसाल मार्गावर वीज वितरण कंपनीतर्फे केबल वीज लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून या वाहिन्या टाकताना ठिकठिकाणी रस्ता खणून लाईन टाकली आहे. आनंदव्हाळ येथील अवघड उताराच्या सुरुवातीला व जेथे उतार संपून दुसरा चढाव सुरू होतो, तेथे भलामोठा चर खोदून अपघाताला आमंत्रण दिले आहे. सध्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली असून शेकडो पर्यटकांच्या गाड्या मालवणच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढे चालणाऱ्या वाहन चालकांना या चराचा अंदाज येत नसल्यामुळे हे वाहन चालक अचानक ब्रेक करतात. त्यामुळे त्या वाहनाच्या मागून येणारी वाहने एकामेकाला धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी येथे अपघातही झालेत. वाहनचालकांना याचा त्रास जास्त होतो.
याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारे असता, काम करतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ‘अनामत रक्कम म्हणून दोन कोटी जमा केले असून त्यांनी ते काम करून घ्यायचे आहे, असे सांगून हात वर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनामत रक्कम भरली आहे, तर मग हे चर का बूजविले जात नाहीत, असा सवाल करून हे दोन कोटी अधिकारी वर्गाच्या खिशात गेले काय, असा सवाल वाहनचालकांनी केला आहे.
