⚡मालवण ता.२७-:
धामापूर येथील युनिव्हर्सिटी ऑफ लाईफमध्ये निवासी इंटर्न म्हणून कार्यरत असलेल्या कौशलराम जोशी याने जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच पार पडलेल्या १५० व्या बाबा हरिवल्लभ संगीत प्रतियोगिता २०२५ मध्ये ‘जोरी’ वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
कौशलराम जोशी हा एक ‘अनस्कूलर’ असल्याने त्याचे हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे. औपचारिक शालेय शिक्षण सोडून स्वतःच्या आवडीला प्राधान्य देत त्याने युनिव्हर्सिटी ऑफ लाईफमध्ये निवासी इंटर्नशिप स्वीकारली. पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभव, कला आणि जीवनमूल्यांच्या आधारे शिक्षण घेण्याचा त्याचा निर्णय आज यशस्वी ठरल्याचे या यशातून स्पष्ट झाले आहे.
केवळ १७ वर्षाचा असलेला कौशलराम हा मूळचा फोंडा (गोवा) येथील रहिवासी असून, गोवा व सिंधुदुर्ग परिसरातून ‘जोरी’ वाद्य वाजवणारा तो एकमेव कलाकार आहे. स्पर्धेदरम्यान त्याने १५.५ मात्रांचा अत्यंत कठीण ‘विचित्र गज झंपा’ ताल सादर करत परीक्षकांची दाद मिळवली. यावेळी कुडाळ येथील अमित उमळकर यांनी हार्मोनियमवर त्याला साथ दिली. कौशलराम सध्या लुधियाना येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘जोरी’ वादक उस्ताद ग्यानसिंग नामधारी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. जोरी हे ऐतिहासिक वाद्य पाचवे शीख गुरु गुरु अर्जुन देवजी यांनी पखवाजापासून विकसित केले असून, प्रामुख्याने गुरुबानी कीर्तनासाठी त्याचा वापर केला जातो. या वाद्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे टून लाकूड वापरले जाते.
या स्पर्धेत कृष्णा भोईते (प्रथम) आणि रोहन भिसे (द्वितीय) यांनीही यश संपादन केले. युनिव्हर्सिटी ऑफ लाईफच्या या अभिनव शैक्षणिक प्रयोगातून कौशलरामसारखे गुणवान कलाकार घडत असल्याबद्दल कला व शिक्षण क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.
