“सामूहिक श्रमदानातून आंबेरी शाळेचा सुरक्षा प्रश्न मार्गी”…

⚡मालवण ता.२४-:
सामूहिक प्रयत्नातून गावाचा विकास कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण आंबेरी ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. आंबेरी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आणि गावातील सर्व बांधकाम कामगारांनी एकत्र येत श्रमदानातून शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक होती. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि साहित्याची उपलब्धता करून दिली. २२ ते २४ डिसेंबर या अल्प कालावधीत गावातील सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे योगदान दिले. या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे २५० फूट लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले.

आजच्या काळात जिथे प्रत्येक कामासाठी मोठ्या निधीची प्रतीक्षा केली जाते. तिथे आंबेरीतील बांधकाम कामगारांनी स्वतःहून पुढे येत सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ आपल्या गावातील मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हे श्रमदान केले. ग्रामपंचायतीने साहित्याचा पुरवठा करून या कामाला गती दिली.

You cannot copy content of this page