स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे : नागरिकांची मागणी_
*💫वेंगुर्ले दि.१३-:* वेंगुर्ले मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. आज सकाळपासून वीज गायब होण्याचे प्रकार सुरू आहेत. ना वारा ना पाऊस मात्र संध्याकाळी वीज खंडित होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना महामारी चे संकट असल्याने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना सध्या वाढत्या उष्णतेने ही त्रास होत आहे. यातच वीज वितरण कंपनी कडून वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळ, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री अशा आवश्यक वेळेतच वीज खंडित होत आहे. संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे 33 केव्ही लाईन खराब आहे, कुडाळ वरून वीज खंडित करण्यात आली आहे अशी टिपीकल उत्तरे मिळतात. अजून पावसाळा सुरु झालेल्या नसून मे महिन्यात जर विजेच्या अशा तक्रारी असतील तर पावसाळ्यात यापेक्षाही परिस्थिती वाईट होऊ शकते. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पहावे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विजेच्या खेळखंडोबा परिस्थितीकडे लक्ष द्यावा अशी मागणी होत आहे.
