⚡बांदा ता.२३-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील नऊ माध्यमिक शाळा, तीन कनिष्ठ महाविद्यालये तसेच इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्षाप्रमाणे यंदाही आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा महोत्सव मंगळवार व बुधवार, दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी बांदा येथील खेमराज प्रशालेच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहे.
या महोत्सवात धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धांसह क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी असे सांघिक खेळ आयोजित करण्यात आले आहेत. याचबरोबर मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून कै. पं. जवाहरलाल नेहरू स्मारक वक्तृत्व स्पर्धाही विविध वयोगटांसाठी घेण्यात येणार आहेत.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २३ रोजी सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गअप्पर पोलीसअधीक्षक नयोमी साटम यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उद्घाटनप्रसंगी डॉ. दिलीप सावंत, डॉ. तुषार कासकर, डॉ. नारायण नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संस्था अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, शाळा समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर तसेच सहसचिव नंदकुमार नाईक यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण बुधवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ३.३० वाजता बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्व क्रीडा प्रकारांसाठी खेमराज प्रशाला व क्रीडांगण सर्वतोपरी सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक नंदकिशोर नाईक यांनी केले.
बांदा येथे २३ व २४ डिसेंबर रोजी आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन…
