२० डिसेंबरला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची घेणार भेट..
कणकवली : डॉ. नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिचा कोल्हापूर येथे झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर जमावाकडून नागवेकर हॉस्पिटलची झालेली तोडफोड या दोन्ही घटना दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम झाली असती तर किरकोळ शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली नसती, असा सूर उपस्थितांनी आळवला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी २० डिसेंबर रोजी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोपुरी आश्रम येथील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत सुरुवातीला मृत कस्तुरी पाताडे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर म्हणाले की, कणकवलीत घडलेल्या घटना दुर्दैवी असून सार्वजनिक रुग्णालये पूर्ण क्षमतेने सक्षम नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते. किरकोळ आजारांवरही खर्चिक उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांमध्ये असंतोष निर्माण होतो. नागरिकांच्या भावना आणि अपेक्षा पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भेट घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाळू मेस्त्री यांनी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज व्यक्त करत, या लढ्याचे उद्दिष्ट शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करणे हेच असावे, असे सांगितले. या दृष्टीने ‘साथी’सारख्या संस्थांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नंदन वेंगुर्लेकर यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन त्रुटी जाणून घ्याव्यात व त्या आरोग्यमंत्री तसेच संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून मांडाव्यात, असे मत व्यक्त केले.
गोपुरी आश्रमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले की, उपचारासाठी कर्ज काढणे किंवा जमीन विक्री करणे ही जिल्ह्यातील वास्तव परिस्थिती आहे. शासकीय रुग्णालयांत दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
व्हि. के. सावंत यांनी घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तर संजय गोरुले यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आजही सुधारलेली नसल्याचे सांगत, गोवा व कोल्हापूर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते, ही बाब चिंताजनक असल्याचे नमूद केले.
या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
