चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपींची सशर्त जामिनावर मुक्तता…

⚡मालवण ता.१६-:
मालवण शहरात सीसीटीव्ही कॅमेरा आणि मेमरी कार्ड चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी मालवण येथे पहिल्या मजल्यावरील खोलीबाहेर बसवलेला सुमारे ६,१५० रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा आणि मेमरी कार्ड चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी किरण संदीप कोयंडे यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रवींद्र रामनाथ कोयंडे (रा. मालवण), राखी रवींद्र कोयंडे आणि श्री. गुरुप्रसाद ज्ञानदेव भगत (रा. निवती मेढा, ता. वेंगुर्ला) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या संदर्भात येथील पोलिसांनी रवींद्र रामनाथ कोयंडे आणि गुरुप्रसाद ज्ञानदेव भगत या दोघांना अटक केली. अटकेनंतर आज पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले आणि पुढील तपासकामासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

आरोपींच्या वतीने येथील वकील एस. यु. पराडकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी न देता १५ हजार रकमेच्या सशर्त जामिनावर त्यांची तात्काळ मुक्तता करण्याचे आदेश दिले.

You cannot copy content of this page