⚡सावंतवाडी ता१६.-:
कुणकेरी गावातील गावडेवाडी येथील रहिवासी श्री. दीपक आना मेस्त्री यांनी ग्रामपंचायत कुणकेरीच्या दुर्लक्षाविरोधात थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवर बसून आंदोलन छेडले.
दि. २५/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या कालावधीपासून गावडेवाडी परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप श्री. मेस्त्री यांनी केला आहे.
घरगुती वापरासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. दीपक मेस्त्री यांनी हंडा व कळशी घेऊन ग्रामपंचायत कुणकेरीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन केले.
“पाणी हा मूलभूत प्रश्न असूनही ग्रामपंचायतकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्वरित सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली असून, ग्रामस्थांकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
