अर्धा तास झाली चर्चा ; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण.
कणकवली : शिंदे सेनेचे नेते तथा माजी आमदार राजन तेली व उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची कणकवलीत मधील तेली यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भेट झाली. अर्धा तास या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा झाली असं बोललं जात असलं तरी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेत बेकायदेशीर कर्ज वाटप झाल्याचा आरोप तेली यांनी केला होता व त्याचे पुरावे देखील पत्रकार परिषदेत दिले होते.
त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर जिल्हा बँकेची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे म्हटलंय. सिंधुदुर्ग बँक सर्वोत्कृष्ट होण्यासाठी अध्यक्ष मनीष दळवी व संचालक मंडळ चांगले काम करतेय महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही. अशी सोशल मीडियावर पोस्ट निलेश राणे यांनी केली. त्यानंतर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय.
