रात्रीच्या वेळी मालवणच्या समुद्रात थरार:कारवाईसाठी मच्छिमार आक्रमक…
⚡मालवण ता.१५-:
मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात केरळ मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरु असून काल रात्री मालवण समोरील जुवा क्षेत्रातील १७ वाव समुद्रात झुंडीने आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत जोशी यांच्या नौकेवर चाल करीत त्यांची समुद्रात टाकलेली प्रत्येकी २५ किलो वजनाची न्हय मासेमारीची २० जाळी तोडून चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे जोशी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत श्रमिक मच्छिमार संघाने मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयात धडक देत मच्छिमारांनी सदर दोन हायस्पीड ट्रॉलर्सचे टिपलेले नोंदणी क्रमांक सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना सादर करत जाळी चोरून नेणाऱ्या केरळ येथील त्या दोन ट्रॉलर्सवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करावी तसेच नुकसान ग्रस्त मच्छिमारांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली. तसेच यापुढे केरळचे हायस्पीड ट्रॉलर्स पकडल्यावर ट्रॉलर मालकांना मालवणात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिला.
मालवण धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत जोशी हे काल रात्री आपली हर्षवर्धन ही मच्छिमारी नौका घेऊन पांडुरंग माणगावकर, देवेंद्र धुरी व आत्मराम धुरी यांच्या समवेत न्हय च्या मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मालवण समोरील १६ ते १७ वाव समुद्रात जुवा या क्षेत्रात न्हय मासेमारी करत असताना त्यांनी समुद्रात जाळी टाकून ठेवली होती. यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केरळ मलपी येथील अनेक परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स झुंडीने आले असता काही ट्रॉलर्स जोशी यांच्या ट्रॉलर्सवर चाल करून आले. यामुळे समुद्रात टाकलेली जाळी फाटून ती हायस्पीड ट्रॉलर्सनी ओढत नेली. सदर जाळीचे प्रत्येकी २५ किलो वजनाचे २० नग होते. यामुळे जोशी यांचे सुमारे ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेवेळी मच्छिमारांनी बॅटरीच्या प्रकाशात सदर दोन हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर लिहून घेतले होते.
या घटनेनंतर श्रमिक मच्छिमार संघांचे उपाध्यक्ष आणि मच्छिमार नेते बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली आज पारंपारिक मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स कडून स्थानिक मश्चिमारांच्या जाळ्यांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत लक्ष वेधले. यावेळी जोगी यांच्या समवेत जगदीश खराडे, सुजित मोंडकर यांच्यासह नुकसानग्रस्त मच्छिमार व इतर मच्छिमार उपस्थित होते.
यावेळी बाबी जोगी यांनी मच्छिमारांनी लिहून घेतलेले हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना सादर करत या नंबर द्वारे ट्रॉलर्सची माहिती काढून ट्रॉलर मालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली. यावेळी मत्स्य विभाग कार्यलयातील अधिकाऱ्यांनी सदर नंबर द्वारे मत्स्य विभागाच्या साईटवर शोध घेतला असता दोन नंबर पैकी एका नंबरवर नोंदणी असलेल्या केरळ मलपी येथील अजय डिसोजा यांच्या मालकीच्या श्री दुर्गा परमेश्वरी (IND-KA-02-MM- 5240) या ट्रॉलरची माहिती मिळाली.
“आमचा ट्रॉलर केरळातच !”
यावेळी नंबर वरून मिळालेल्या ट्रॉलरच्या माहितीनुसार अजय डिसोजा या ट्रॉलर मालकास बाबी जोगी यांनी मोबाईलद्वारे संपर्क करून नुकसानीबाबत जाब विचारला असता त्या ट्रॉलरमालकाने आमचा ट्रॉलर केरळातच आहे, तो सिंधुदुर्गात आलाच नव्हता, तसेच श्री दुर्गा परमेश्वरी नावाचा आमचा ट्रॉलरच नाही, कोणीतरी आमचा नंबर वापरून ट्रॉलर सिंधुदुर्गात आणला असेल, असे उत्तर दिल्याने जोगी यांनी संताप व्यक्त केला. मच्छिमारांनी दिलेल्या नंबरच्या ट्रॉलरची माहिती मत्स्य विभागाच्या साईट वर असल्याने सदर नंबर खरा असून मत्स्य विभागाने सदर नौका मालकाची चौकशी करून तपास करावा आणि कारवाई करावी, तसेच त्या नौका मालकाच्या सांगण्यानुसार एका ट्रॉलरचा नंबर वापरून दुसरे ट्रॉलर मच्छिमारी करत असतील तर ही मत्स्य विभागाची मोठी फसवणूक असून त्यावर कडक पावले उचलवीत असेही जोगी म्हणाले.
ट्रान्सपॉंडर आपत्कालीन यंत्रणा बिनकामाची
यावेळी नुकसानग्रस्त मच्छिमार हेमंत जोशी म्हणाले, ज्यावेळी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी आमच्या नौकेवर चाल करून जाळ्यांचे नुकसान केले त्यावेळी नौकेवर बसविण्यात आलेल्या मत्स्य विभागाच्या ट्रान्सपॉंडर या आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या यंत्राद्वारे आम्ही मत्स्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याद्वारे मत्स्य विभागाचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपत्कालीन स्थितीत तसेच मच्छिमारांच्या जीवावर बेतले असताना ही यंत्रणा काम करत नसेल तर तिचा उपयोग काय ? त्यापेक्षा मत्स्य विभागाने हे ट्रान्सपॉंडर काढून परत घ्यावेत, असेही जोशी यांनी सांगितले.
कारवाईसाठी आवश्यक ते सहकार्य करू – कुवेसकर
यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांनी मच्छिमारांच्या जाळ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून सदर नौका मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मत्स्य विभागाचे शिफारस पत्र देण्यात येईल. तसेच केरळ येथील मत्स्य व्यवसाय आयुकताना याबाबत माहिती देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात येतील, त्याच प्रमाणे मच्छिमारांनी जाळी नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले.
