काजू उत्पादनाला किलो मागे २०० रुपये हमीभाव द्या…

जिल्हा शेतकरी संघटना व काजू उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी..

सिंधुदुर्गनगरी ता १५
चालू वर्षीच्या हंगामापूर्वी काजू बी करिता हमीभाव निश्चित करून काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अथवा काजू बी साठी बोनस अनुदान द्यावे. अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना व काजू उत्पादक शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बदलत्या हवामानामुळे गेली चार-पाच वर्षे नुकसान होत आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झालेली आहे, मात्र काजू बी ला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील फळ संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेल्या प्रगत जातीची कलमे लावून शेतकऱ्यांनी आपल्या बागा तयार केलेल्या आहेत. या काजूबागांचे जतन करण्यासाठी व देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. मात्र उत्पादित होणाऱ्या काजू बी ला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे नुकसान होते मात्र त्या प्रमाणात नुकसान भरपाई शासनाकडून मिळत नाही. तरी शासनाने काजू बी साठीचा जोखीम कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवून द्यावा. वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच फळ पिकावरील उद्भवणाऱ्या कीड रोगाच्या प्रतिबंधासाठी फळ संशोधन केंद्राकडून प्रभावी कीटकनाशकाचे संशोधन व्हावे .आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले .यावेळी जिल्हा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर राय, देवेंद्र सावंत, समीर गावकर, सोमनाथ परब, संतोष तांबे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page