*मालवण वरेकर नाट्यगृहात कोविशिल्ड लसीकरणास सुरुवात

*योग्य नियोजन नसल्याने लसीकरण केंद्रावर उडाला गोंधळ; सोशल डिस्टन्स चा उडाला फज्जा*

मालवण दि प्रतिनीधी-: मालवण ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीचे २३० डोस प्राप्त झाल्यावर आज लसीकरणासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून मामा वरेरकर नाट्यगृह येथे लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या असतानाच नऊ वाजता लसीकरणास प्रारंभ झाल्यावर नियोजना अभावी मोठा गोंधळ उडाला. या गोंधळात रांगा मोडल्या जाऊन नागरिकांनी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडाला. २३० डोस असताना आरोग्य प्रशासनाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी सूचना सोशल मीडियावर फिरवल्याने ही गर्दी उसळून नियोजनाअभावी गोंधळ उडाल्याचे नागरिकांनी सांगत तीव्र संताप व्यक्त केला. मालवण ग्रामीण रुग्णालयातर्फे सध्या मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आज ४५ वर्षावरील व्यक्तीसाठी लसीकरण सुरू करण्यात आल्यावर प्रचंड गोंधळ उडाला मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी काल रात्री सोशल मीडियावर हे लसीकरण ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असे सांगत नागरिकांना लसीकरणासाठी आरोग्य विभागाने आवाहन केले होते. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य असल्याने आज पहाटे पाच वाजल्यापासूनच नाट्यगृहाबाहेर नागरिकांनी आपापल्या चप्पल लावून शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावली होती. पावणे नऊ वाजता आरोग्य कर्मचारी, पोलीस व नगरपालिका कर्मचारी या केंद्रावर दाखल झाल्यानंतर रांगेत उभे असलेल्या नागरिकांची नावे घेण्यात आली. प्रथम नऊ नावे घेतल्यावर त्या वीस जणांना आत घेण्यात आले. मात्र पुढे नावे घेतली जात नसल्याने गोंधळ निर्माण झाला. लसीच्या उपलब्धतेनुसार रांगेत असलेल्या २३० नागरिकांची नावे नोंदवून घ्या, त्यामुळे ज्यादा आलेले नागरिक घरी जाऊ शकतील व गर्दी कमी होईल किंवा वीस जणांना आत सोडल्यावर इतरांची नावे नोंदवून रांगा पुढे ढकण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने एकच गोंधळ होऊन रांगा मोडल्या जाऊन प्रवेशद्वारावर एकच गर्दी झाली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना प्रवेशद्वारावर रोखून धरले होते. यानंतर जमलेल्या गर्दीला आत सोडत नागरिकांना नाट्यगृहात बसविण्यात आले. २३० नागरिकांची संख्या पूर्ण झाल्यावर बाकी राहिलेल्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला. यामुळे रांगेत राहूनही अनेकांना माघारी फिरावे लागले. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. राहिलेल्या नागरिकांची नावे आरोग्य प्रशासनाकडून पुढच्या लसीकरणासाठी नोंदवून घेण्यात आली.

You cannot copy content of this page