सावंतवाडी : येथील सालईवाडा परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना खेचून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना सावंतवाडी पोलिसांनी कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले आहे. आज (रविवार, १९ जुलै) त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २० जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैभव नारायणराव अडोळे (वय २६, मूळ रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, मूळ रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा दागिना हस्तगत केला आहे. १० जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथील रहिवासी रंजना ठाकूर या आपल्या इमारतीखालील रस्त्यावरून चालत जात असताना, दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने खेचून मोटारसायकलवरून पलायन केले होते. या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर परिसरातही अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तेथील पोलीस तपासादरम्यान आरोपींनी सावंतवाडीतील गुन्ह्याची कबुली दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपींना कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड (टी. आय. परेड) करावयाची असल्याने, त्यांना चेहऱ्यावर मास्क लावून न्यायालयात हजर करण्यात आले होते. सावंतवाडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
