मालवण (प्रतिनिधी)
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व इयत्तांची नव्याने पाठ्यपुस्तके निर्मिती करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे मार्फत इयत्ता नववीच्या इतिहास पाठ्यपुस्तक लेखन समितीवर मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे उपक्रमशील प्राध्यापक नागेश कदम यांची निवड झाल्याचे पत्र संचालकांनी दिले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके शासनाच्या वतीने प्रकाशित केली जातात. प्रा. नागेश कदम यांनी या अगोदर परिसर अभ्यास, इतिहास, नागरिकशास्त्र तसेच हिंदी अभ्यासक्रम निर्मिती समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच ते राज्य जिल्हास्तरावर विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करीत असतात. सातत्याने निबंध कथा, कविता लेखन करीत असतात. त्यांच्या या अनुभवाचा पुस्तक रूपाने फायदा होण्यासाठी बालभारती पुणे यांच्यामार्फत त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. नागेश कदम यांच्या निवडीचे कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शालेय समितीचे अध्यक्ष महादेव पाटकर, डीएड कॉलेजचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय माळी, सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
