⚡बांदा ता.१९-: सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या कृषी, सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
विलास सावंत यांनी गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. काजू, आंबा, नारळ, सुपारी आदी पिकांच्या विकासासाठी त्यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित करण्याबरोबरच शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
डिंगणे गावात युवक व महिला मंडळांची स्थापना, महिला बचतगट उभारणी, ग्रामविकास, वीज, पाणी, पोस्ट सुविधा तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, अनुदान व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, काजू पिकाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी-पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क व बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराबद्दल विलास सावंत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व विविध स्तरांतील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
फोटो:-
विलास सावंत.
सिंधुदुर्गचे फळबागायतदार नेते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर…
