कुडाळ बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली खंत:साळगाव येथे ५३ व्या कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ..
⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घ्यायला कुडाळ तालुक्यातील एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली. साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यलयात कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आज झाला त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. वालावलकर बोलत होते. कोणतीच शाळा तयार नसताना साळगावच्या प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यलयाने प्रदर्शन आयोजित करण्याची तयारी दर्शवली त्यामुळे यावर्षी कुडाळ तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन तरी घेता आल्याचं त्यांनी सांगितलं.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून कुडाळ तालुकास्तरिय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाला आज साळगावच्या प्रमोद रवींद्र धूरी अध्यापक महाविद्यालयात सुरुवात झाली. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून झाले. जिल्हा परिषद शाळा साळगाव नम्बर एक च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. यावेळी गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर शारबिद्रे, कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अजित परब, परीक्षक संदीप गुरव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष शशांक आटक, विस्तार अधिकारी स्वप्नाली वारंग आणि रश्मी ठाकुर-देसाई, परीक्षक उदय गोसावी, कृषी विद्यालय ओरोस प्रसाद ओगले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विवेकानंद बालम, साळगाव शाळा नंबर. १ चे मुख्याध्यापक श्री. मसके आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM या संकल्पनेवर आधारित असलेल्या या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक विभागात ४९ विद्यार्थी, ३ शिक्षक, ३ दिव्यांग विद्यार्थी, आणि ४ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर माध्यमिक विभागात २२ विद्यार्थी, २ शिक्षक, ४ दिव्यांग विद्यार्थी तर दोन शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यावेळी गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, ज्ञानापासून प्रज्ञेकडे घेऊन जाणारा प्रवास हा विज्ञानाच्या वाटेवरूनच सुरू होतो. आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी विज्ञान महत्त्वाचे आहे. देशाची प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत होण्यासाठी विज्ञान महत्त्वाचे आहे. यापूर्वी शासनाकडून विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी निधी दिला जात होता. मात्र गेल्यावर्षीचा निधी अद्याप मिळाला नाही. कुडाळ तालुक्यातील कुठलीच माध्यमिक शाळा विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी तयार नव्हती. ही गोष्ट निश्चितच विचार करण्याजोगी आहे, आणि आपल्याला तेवढीच भूषणावह सुद्धा नाही.
श्री . वालावलकर पुढे म्हणाले,गेली अनेक वर्षे हा ज्ञान यज्ञ सुरु आहे. या ज्ञानयज्ञात शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत. हे सर्वजण या ज्ञान यज्ञाचे काम अखंडपणे करीत आहेत. या सर्वांच्या इच्छा आकांशा त्यात एकवटल्या आहेत. त्यामुळेच हा ज्ञान यज्ञ एवढी वर्ष धगधगतो आहे. शालेय शिक्षणाचा प्रवास, विद्यार्थ्यांचा विकास व दैनंदिन जीवनात विज्ञान महत्वाचे आहे. देशाची उभारणी ही भावी पिढीच्या विज्ञान दृष्टीहीन असण्यामुळेच घडू शकते. त्यामुळेच या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी आपण आपल्याला बुद्धीचा वाटा त्यामध्ये टाकणे गरजेचे आहे. पर्यावरण, निसर्ग आणि आपली संस्कृती या विज्ञानातून जपणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षक आहेत तोपर्यंत ही ज्ञानलालसा अशीच सुरु राहणार आहे. तुम्ही मांडलेल्या प्रतीकृती नक्कीच राज्यस्तरावर जातील, हे प्रदर्शन आपल्या तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संदीप गुरव म्हणाले, छोट्या मुलांमधील वैज्ञानिक दृष्टीकोणासाठी व दैनंदिन जीवनासाठी हे प्रदर्शन महत्वाचे आहे. गावामधील विद्यार्थ्यांमध्ये खरी हुशारी व आत्मविश्वास असतो. त्यामुळे जिल्हा, राज्य पातळीवर ही मुले चमकतात, असे त्यांनी सांगितले. शशांक आटक म्हणाले, अतिशय कमी वेळात या प्रशालेने या प्रदर्शनाचे नियोजन केले. गेल्यावर्षीचा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा निधी अजून मिळाला नाही. त्यामुळे तालुक्याच्या बजेटच्या निधीबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांची तारांबळ उडते. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनाला निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
उदघाटन सोहळयाचे प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले. सूत्र संचालन साळगाव हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक विद्यांनंद पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन अध्यापक महाविद्यालयाचे आर. बी. जाधव यांनी केले. उदघाटन सोहळा संपल्यानंतर गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. त्यांनतर विज्ञान प्रतिकृती मांडलेल्या प्रदर्शन हॉलचे उदघाटन सुद्धा प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते झाले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतीची पाहणी केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या वैज्ञानिक प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. १५ डिसेंबरला या विज्ञान प्रदर्शनचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
