खड्डे बुजविले न गेल्यास रास्ता रोकोचा इशारा..
⚡मालवण ता.०९-:
मालवण- आचरा सागरी महामार्गावरील कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला जाब विचारला. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठेकेदाराकडून उद्या १० डिसेंबर पासून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र काम सुरु न झाल्यास या मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सागरी महामार्गावरील कोळंब गावातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कोळंब पुल ते सर्जेकोट वळणापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यातून वाट काढत वाहन चालविणे मुश्किल बनले आहे. या कसरतीमध्ये अनेक वाहनचालकांचे अपघातही झाले आहेत. याबाबत कोळंब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधून खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. या कामाची वर्क ऑर्डर झाली, काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात कामच सुरु होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आज मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी ग्रामस्थांनी खड्ड्यामुळे रस्त्याची झालेली दयानीय अवस्था आणि वाहनचालकांना होणारा त्रास यांचा पाढा वाचत आक्रमक भूमिका घेतली. खड्डे बुजविण्याचे केवळ साहित्य येऊन पडले आहे, त्यानंतर अनेक दिवस लोटले तरी कामास सुरुवात का झालेली नाही, ठेकेदार काय करतोय ? असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठेकेदाराशी फोनद्वारे संपर्क करण्यास सांगून ठेकेदारालाही खडे बोल सुनावले. यावेळी ठेकेदाराने उद्या दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावर ग्रामस्थांनी आम्हीही सर्व सकाळी दहा वाजता कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणार असून काम सुरु न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. तसेच रास्ता रोकोमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असेही ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी कोळंबच्या सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, माजी सरपंच प्रतिमा भोजने, सर्जेकोट- मिर्याबांदा सरपंच नीलिमा परुळेकर, प्रमोद कांडरकर, प्रसाद भोजने, सुरेश लाड, बापू बावकर, विजय भोजने, गणेश कोळंबकर, सुशांत भोजने, पंकज कवटकर, विशाल फणसेकर, उदय आंगणे, दिनेश मेथर, शैलेश प्रभूगांवकर, प्रसाद कामतेकर, सचिन नरे, भाऊ फणसेकर, सुधाकर लाड, मिनेश चव्हाण, चेतन भोजने, उदय आंगणे, प्रशांत सावंत, गणेश आचरेकर, प्रदीप भोजने, हेमंत कामतेकर, श्री.फाटक, महेश फाटक, निलेश भोजने, महेश कदम, संग्राम कासले आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
