समीक्षा फडके हिला अभिनय रौप्य पदक:भरत मेस्त्री याना रंगभूषेसाठी दुसरा क्रमांक..
⚡कुडाळ ता.०८-: श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी या मंडळाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली आहेत. स्त्री अभिनय विभागात समीक्षा फडके यांनी प्रथम क्रमांक, तर रंगभूषा विभागात भरत मेस्त्री यांनी द्वितीय क्रमांक मिळवत मंडळाचा मान उंचावला.
वसंत कानेटकर लिखित आणि संतोष सगळे दिग्दर्शित या नाटकात सर्व कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या. भरत मेस्त्री, सुभाष जोशी, संतोष सांगळे, रुपेश खडपकर, श्याम सांगळे, ऋग्वेद वाडयेकर यांनी उत्स्फूर्त अभिनय सादर करून नाट्यकृतीची ताकद वाढवली. तर स्त्री भूमिकांमध्ये कीर्ती चव्हाण, कीर्ती सांगळे आणि समीक्षा फडके यांनी अतिशय प्रभावी आणि भावस्पर्शी अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली.
या नाटकास विशेष मार्गदर्शन अवधूत भिसे सर यांचे लाभले, ज्यामुळे सादरीकरणात अधिक परिपूर्णता आली. गेल्या वर्षी वेंगुर्ला तालुक्यातील कालवीबंदर येथे झालेल्या नाट्यस्पर्धेत या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाल्याने या नाट्यकृतीची गुणवत्ता आधीच सिद्ध झाली होती.
समीक्षा फडके आणि भरत मेस्त्री यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून मंडळाने मिळवलेले हे यश गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारे ठरले आहे.
