संविधान हिच आपली ओळख…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:बॅ शिक्षण संस्थेत संविधान अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान ,डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध..

⚡कुडाळ ता.०८-: संविधान हि आपली ओळख आहे. या संविधानाने आपल्याला नागरिकत्व दिल आहे. संविधानामुळेच आपल्यामध्ये समानता आहे. जगाला आदर्शभूत असणाऱ्या आपल्या भारतीय संविधानाचे आणि या संविधानाचे मानवता पोषक विचारसरणीच आपण ऋण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं. कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त-समाज कल्याण सिंधुदुर्ग आयोजित ‘घर घर संविधान’, ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचे ‘संविधानाने आपल्याला काय दिले’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होत. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे बोलत होत्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या संविधानाच्या स्तंभाला, संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह सिंधुदुर्गचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या कालूशे, तहसीलदार सचिन पाटील, समाज कल्याण विभागाचे अधिकारी तुषार गवळी, उदय यादव, प्रा. जमदाडे, बॅरिस्टर नाथ पै कला ,वाणिज्य ,विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, संस्था अधिकारी पल्लवी कामत इत्यादी उपस्थित होते.
जागतिक कीर्तीचे व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी ”संविधानाने आपल्याला काय दिले” या विषयावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. अतुलनीय, अद्वितीय,अप्रतिम आणि जगातील सर्वात मोठे मानवतेचा सन्मान करणारे संविधान म्हणजे भारतीय संविधान असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता आणि निकोप लोकशाही वर्धिष्णू करणारे भारतीय संविधान आहे. जिथे भेदाभेदाला थारा नाही, जिथे समतेचा संदेश दिला जातो, जेथे सामान्यातल्या सामान्यातल्या माणसाचा विचार केला जातो, जिथे निरोगी निर्भय न्यायची अपेक्षा केली जाते. जे आज जगाला आदर्शभूत झालेले आहे. असे भारतीय संविधान हे आपले संविधान आहे याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयांच्या मनात असला पाहिजे असे उद्गार डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी काढले. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. कोकाटे यांनी भारतातील मानवतेचा सन्मान करणाऱ्या संविधानातील विविध महत्त्वाच्या कलमांची उपस्थितांना माहिती करून दिली. परिचय करून दिला आणि त्या अनुषंगाने सर्वात मोठा कायदा म्हणजे संविधान, असा गौरव केला आणि याचे लेखन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची व त्यांच्या सहा सहकाऱ्यांच्या मदतीने तयार झालेल्या आदर्शभूत अशा संविधानाची महती, त्याची थोरवी त्यांनी कथन केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्या म्हणाल्या, जगाला आदर्शभूत असणाऱ्या आपल्या भारतीय संविधानाचे निर्माते व या संविधानाचे मानवता पोषक विचारसरणीचे आपण ऋण विसरून चालणार नाही. या संविधानातील प्रत्येक कलमी ही मानवाचा सन्मान करणारी आहेत, त्यांचा आदर करूया आणि त्या कलमांच्या अनुषंगाने आपले दैनंदिन जीवन आनंदमय, सुखमय, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे बनवूया, असा संदेश त्यांनी दिला. शासनाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचा सन्मान करणाऱ्या ‘घरघर संविधान’ या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच स्वागत आणि सत्कार संतोष चिकणे आणि सहकारी तसेच उमेश गाळवणकर यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांसह बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील कर्मचारी, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद करपे यांनी केले तर आभार तुषार गवळी यांनी मानले.

You cannot copy content of this page