Headlines

हमारा शौचालय, हमारा भविष्य…

जिल्हा परिषदेची विशेष मोहीम सुरू:मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे सहकार्य करण्याचे आवाहन..

ओरोस ता २५-:केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचाय व सर्व सिंधुदुर्गवसियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.


“हमारा शौचालय, हमारा भविष्य” या विशेष मोहिमेत शौचालय ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज असल्याचे रविंद्र खेबुडकर यांनी म्हटले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण तसेच हवामान अनुकूल स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
यानिमित्त 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालये यांना अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील. तरी या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी केले आहे.

फोटो: रवींद्र खेबुडकर

You cannot copy content of this page