आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे क्रीडा संकुलाचे काम रखडले : उपसभापती शीतल राऊळ यांचा आरोप
*💫बांदा दि.११-:* सावंतवाडी येथे जिमखाना मैदान असताना केवळ आपल्या हट्टापायी तालुका क्रीडा संकुल सावंतवाडी येथेच व्हावे या आमदार दीपक केसरकर यांच्या अडेलपणामुळे बांदा येथे प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलाचे काम रखडले असल्याचा आरोप पं. स.उपसभापती शीतल राऊळ यांनी केला. तसेच आमदार केसरकर हे केवळ सावंतवाडी शहराचे आमदार असल्यासारखे वागत असल्याचा टोला लगावला आहे. सावंतवाडी तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल बांदा येथील सुमारे तेरा एकर जागेत प्रस्तावित आहे. मात्र अद्याप या क्रीडा संकुलाच्या कामाच्या कोणत्याही प्रत्यक्ष कार्यवाहिला सुरुवात झाली नाही. याला आ.केसरकर जबाबदार असल्याचा आरोप बांदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांद्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, माजी सरपंच प्रियांका नाईक, बाळा आकेरकर, केदार कणबर्गी, आबा धारगळकर, सुनील धामापुरकर, सुनील राऊळ, बाबा काणेकर आदि उपस्थित होते.
