रहिवाशांची पोलीस ठाण्यात धाव: संबंधितांवर चौकशी करून कारवाईची केली मागणी..
⚡सावंतवाडी, ता.१०-:
सध्याचे युग ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असले तरी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धेचे काही अंश टिकून असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री सावंतवाडी शहरातील कोलगाव येथे घडलेल्या एका प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील मारुती मंदिराच्या पाठीमागील एका घरात गेल्या सात–आठ दिवसांपासून दररोज रात्री पूजाअर्चा सुरू असल्याचे तेथील रहिवाशांच्या लक्षात आले. दिवसा घरात शांतता असते, मात्र रात्रीच्या वेळी वरच्या मजल्यावरून विचित्र आवाज येत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.
या प्रकारामुळे चिंताग्रस्त झालेल्या काही रहिवाशांनी रविवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सजग नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. “या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई होईपर्यंत आम्ही ठाणे सोडणार नाही,” अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
दरम्यान, नागरिकांच्या संतप्त भूमिकेनंतर सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
