इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे याचा पर्यावरणपूरक उपक्रम..
सावंतवाडी : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या किल्ले जंजिरे सिंधुदुर्ग ची आकर्षक प्रतिकृती मळगाव येथील इतिहास व किल्ले संस्कृतीप्रेमी ज्ञानेश्वर गोविंद राणे या तरुणाने आपल्या घराच्या अंगणात साकारून एकप्रकारे गड-किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. इतिहासाची ओढ, शिवकालीन किल्ल्यांबद्दलचे प्रेम व जिव्हाळा आणि हातातील कौशल्य यांच्या जोरावर राणे याने केलेल्या या कलाकसुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वर राणे हे इतिहासप्रेमी असून शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन, तसेच शालेय मुलांना शिव इतिहासावर व्याख्यान आदी उपक्रम राबवत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी अमृत नावाच्या (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेने ‘अमृत दुर्गोत्सव-२०२५ अंतर्गत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राणे यांनी किल्ले जंजिरे सिंधुदुर्ग ची प्रतिकृती साकारली आहे. किल्ले बांधणीची पारंपरिक शैली व जिवंत भासणारा ठेवा टिकवता ही प्रतिकृती बांधताना राणे याने माती, शेण, चुना आदी पूर्णपणे पर्यावरणपूरक नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करून किल्ल्याची जुनी पारंपरिक बांधकाम शैली जिवंत केली आहे. प्रत्यक्ष सिंधुदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख बांधकामे व महत्त्वाची स्थळे अत्यंत बारकाईनं या प्रतिकृतीत उभी केलेली दिसतात. यामध्ये किल्ल्यावरील भव्य महाद्वार, मजबूत तटबंदी, चुना साठवण्याचे हौद, शिवरायांच्या डाव्या पायाचा व उजव्या हाताचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, झेंडा बुरुज, भगवती मंदिर, गुप्त दरवाजा, दूध बांव, साखर बांव, दही बांव, तुळशी वृंदावन, जरी मरी मंदिर, महापुरुष मंदिर, चुन्याचा घाणा, बुरुजातील गणपती, महाद्वारासमोरील हनुमान, नगारखाना, महादेव मंदिर व त्यातील विहीर, तटबंदीतून खाली जाणारा मार्ग, पहाऱ्याची खोली, तटबंदीतील खोली व टेहळणी बुरुज आदी सर्व वास्तू बारकाईने या किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये राणे यांनी दाखविली आहेत. केवळ किल्ल्याची प्रतिकृतीच नव्हे, तर त्याची ऐतिहासिक रचना, वास्तूंची जागा यावर विशेष लक्ष देऊन ही प्रतिकृती तयार केली आहे. स्थानिक नागरिकांनी व इतिहास प्रेमींनी राणे यांच्या या कलाकसुरीची प्रशंसा करत कौतुक केले आहे.
