एलसीबी आणि कणकवली पोलिसांची बेंगलोरमध्ये धडाकेबाज कारवाई;तीन संशयित अटकेत..
⚡कणकवल ता.२८-: श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व कणकवली पोलिसांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून तिघांना ताब्यात घेऊन पोलिस पथक कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ते कणकवलीत पोहोचतील, असा अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
ही ‘मर्डर केस’ ‘हाय प्रोफाईल’ असल्याने आणखी काही आरोपींचा यात समावेश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसांपूर्वी साळीस्ते येथे महामार्गालगत गणपती सान्याच्या पायरीवर श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. त्याच दिवशी त्यांच्या आईच्या नावे असलेली कार दोडामार्ग तालुक्यात पुलाखाली आढळून आली होती. त्या कारमध्ये रक्ताचे डाग असल्याने मृतदेह आणि कार यांचे ‘कनेक्शन’ स्पष्ट झाले होते.
यानंतर एलसीबी व कणकवली पोलीस अशी दोन पथके बेंगलोरला रवाना झाली होती. गेले तीन दिवस दोन्ही पथके बेंगलोर परिसरात आरोपींचा शोध घेत होती. अखेरीस सोमवारी रात्री तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात हा खून ‘प्रॉपर्टी वादातून’ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. साळीस्ते येथेच रेड्डी यांची हत्या करून मृतदेह तिथेच टाकण्यात आला व त्यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग परिसरात सोडून आरोपी फरार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
