अमृत दुर्गोत्सव उपक्रमातील सहभागी मुले व युवकांना प्रमाणपत्र वितरित…

⚡मालवण ता.२७-:
राज्य सरकार तर्फे आयोजित अमृत दुर्गोत्सव २०२५ या उपक्रमाला मालवण मधील लहान मुले व युवावर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सहभाग घेऊन दिवाळी सणात विविध दुर्ग व किल्ल्यांचे आकर्षक देखावे साकारले. देखावे साकारणाऱ्या या सहभागीना प्रमाणपत्रांचे वाटप हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मालवणमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वराज्य संघटनेच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्रात शासनाच्या अविरत प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या बारा दुर्गांना जागतिक वारसा वास्तू म्हणून वैश्विक दर्जा मिळाला आहे. या अनुषंगाने राज्य सरकार तर्फे अमृत दुर्गोत्सव २०२५ या उपक्रमाचे आयोजन करून दिवाळी मध्ये मुले व तरुणांनी साकारलेल्या दुर्गांच्या देखाव्याचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करण्यात आले होते. शासनाच्या या उपक्रमासाठी मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी पुढाकार घेत दिवाळीमध्ये दुर्ग – गड किल्ल्याचे देखावे तयार केलेल्या बाळगोपाळानी व तरुणांनी देखाव्या सोबतचे आपले छायाचित्र माहितीसह पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मालवणसह जिल्ह्यातील अनेक मुले व युवकांनी प्रतिसाद देत त्यांनी बनविलेल्या गडकिल्ल्याच्या देखव्याचे छायाचित्र पाठवून सहभाग घेतला होता. छायाचित्र पाठविणाऱ्यांना शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले तसेच दुर्ग देखव्याचा फोटो व शिवरायांची प्रतिमा असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले असून या प्रमाणपत्राचे सन्मानपूर्वक वितरण देखावे साकारणाऱ्यांना करण्यात आले. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व सौ. शिल्पा खोत यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सौ. शिल्पा खोत यांनी सहभागी मुलांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, पूजा सरकारे तसेच अंजना सामंत, भाऊ सामंत, दादा वेंगुर्लेकर, मंदार सरजोशी, अश्विनी आचरेकर, शांती तोंडवळकर, श्रीकांत मालवणकर, किशोर खानोलकर, तेजस्विता करंगुटकर, डॉ. धूमक आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page