मालवणात किल्ला होडी सेवा, वॉटरस्पोर्ट पाठोपाठ आता रॉक गार्डन व राजकोट किल्लाही बंद…

पर्यटन पूर्णतः ठप्प, पर्यटक व व्यवसायिकांकडून नाराजी..

⚡मालवण ता.२७-:
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे ऐन दिवाळीच्या पर्यटन हंगामात मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा व वॉटरस्पोर्ट्स बंद ठेवावे लागल्याने पर्यटनाला ब्रेक लागला असतानाच आज मालवण मधील पर्यटकांचे आकर्षण असणारे रॉक गार्डन तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्यावर पाठोपाठ सायंकाळी छत्रपाती शिवाजी महाराज यांचा पुतळा असणारा राजकोट किल्लाही प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव बंद करण्या आल्याने मालवणमधील पर्यटन पूर्णतः ठप्प झाले आहे. किल्ला होडी सेवा व वॉटरस्पोर्ट बंद असल्याने मोठ्या संख्येने आलेले पर्यटक रॉक गार्डन व राजकोट किल्ल्याला भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेत होते. मात्र तांत्रिक कारणांचा फतवा काढत प्रशासनाकडून ही दोन्हीही ठिकाणे आज बंद करण्यात आल्याने पर्यटक तसेच तेथील स्थानिक पर्यटन व्यवसायिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वादळी स्थितीमुळे मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा व वॉटरस्पोर्ट्स आज सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आले. यामुळे दिवाळी सुट्टीनिमित्त मालवणात दाखल होणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तर पर्यटन व्यवसायिकांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन व जलपर्यटन बंद असल्याने पर्यटक रॉक गार्डन व राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी भेट देत होते. या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, तांत्रिक दुरुस्तीच्या कारणास्तव आज रॉक गार्डन बंद करण्यात आले. तर सायंकाळी राजकोट किल्लाही तांत्रिक कारणासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांची मोठी निराशा झाली. ही दोन्ही पर्यटन स्थळे बंद करण्यात आल्याने तेथील पर्यटन व्यावसायिक व स्टॉल धारकही अडचणीत आले आहे.

वादळी स्थिती असली तरी राजकोट किल्ला व रॉक गार्डन या दोन्ही ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. दिवाळी सुट्टीचा हंगाम अजुन काही दिवस शिल्लक असून अचानक ही दोन्ही स्थळे बंद करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळी सुट्टी संपल्यावर दुरुस्तीसाठी ही स्थळे बंद करणे योग्य होते, अशी भूमिका पर्यटन व्यवसायिकांकडून व्यक्त होत आहे.

स्टॉलधारकांनी वेधले खोत दाम्पत्याचे लक्ष

दरम्यान, राजकोट किल्ला बंद करण्यात आल्याने किल्ला परिसरातील स्टॉल धारकांनी मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत व माजी नगरसेवक यतीन खोत यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. किल्ला अचानक बंद करण्यात आल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, तसेच प्रशासनाकडून स्टॉल हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे यावेळी स्टॉलधारकांनी सांगितले. याप्रश्नी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून मार्ग काढण्यात येईल, असे सौ. शिल्पा खोत व यतीन खोत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page