बुडणाऱ्यांसाठीची रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळ खात…

ठाकरे शिवसेनेचा संताप:चार मुलींचे जीव वाचल्यानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष..

⚡मालवण ता.२७-:
बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळ खात पडल्याचे ठाकरे शिवसेनेचे मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी चार दिवसापूर्वी प्रसार माध्यमाद्वारे दाखवून देऊनही ते बिचवर कार्यरत न करता तसेच नगरपालिकेत पाडून ठेवल्या नंतर दोनच दिवसापूर्वी चिवला बिचच्या समुद्रात बुडणाऱ्या चार मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले होते या घटनेनंतरही शहाणे न बनलेल्या प्रशासनाला आज संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी किनारपट्टीवर नियुक्त करण्यात आलेल्या जीवरक्षकांना देखील आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले नसल्याबद्दल ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी
आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या
यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेली स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट पर्यटन हंगामात किनाऱ्यावर का उपलब्ध ठेवली नाही? जर त्या मुली बुडाल्या असत्या तर मालवणची मोठी बदनामी झाली असती, याला जबाबदार कोण? हे रोबोटीक वॉटर क्राफ्ट केव्हा किनारपट्टीवर उपलब्ध करून देणार? पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर प्रशासनाने चिवला तसेच बंदर जेटी ते दांडी या भागासाठी दोन जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

जीव रक्षकांच्या नियुक्तीवर समाधान न मानता पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला. यात या जीवरक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, पर्यटकांना वाचविण्यासाठी आवश्यक रिंग बोया, दोरी, कपडे, ओळखपत्र दिले आहे का? तसेच या जीवरक्षकांचा विमा उतरविण्यात आला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. याबाबतची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने पदाधिकारी अधिकच संतप्त झाले.
संतप्त पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी तसेच किनारपट्टी भागात आणखी दोन जीवरक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यानुसार नगर पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी यांनी याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरताच पालिका प्रशासनाने तातडीने संबंधित जीवरक्षकांना आवश्यक साहित्य तसेच स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट सुपूर्द केले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, अन्वय प्रभू, गौरव वेर्लेकर, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, तपस्वी मयेकर, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, रवी मिटकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, दीपा शिंदे, विद्या फर्नांडिस तसेच नगर पालिकेच्या अधिकारी संध्या गवळी आणि श्री. पवार उपस्थित होते.

You cannot copy content of this page