तांत्रिक दुरुस्तीसाठी रॉक गार्डन बंद ठेवल्याने पर्यटन व्यावसायिक अडचणीत…

सौ. शिल्पा खोत व पर्यटन व्यवसायिकांनी वेधले नगरपालिकेचे लक्ष..

⚡मालवण ता.२७-:
मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डन येथे अनेक असुविधा असून खंडित वीज पुरवठा व अन्य तांत्रिक कारणांनी रॉक गार्डन बंद करण्यात आले आहे. ऐन पर्यटन हंगामात गार्डन बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून गार्डन परिसरातील पर्यटन व्यवसायिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत व पर्यटन व्यावसायिक यांनी मालवण नगरपरिषदेवर धडक देत जाब विचारला. गार्डन मधील असुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत गार्डन सुरूच ठेवून तेथील असुविधा लवकरात लवकर दूर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

सध्या दिवाळी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण शहरात दाखल झाले आहेत. परंतु समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जल क्रिडा बंद असल्याने पर्यटकांचा ओघ रॉक गार्डनमध्ये वळत आहे. मात्र खंडित वीज पुरवठा व अन्य तांत्रिक कारणांनी रॉक गार्डन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून पर्यटक तेथून मागे फिरत आहेत. पर्यटन व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे. ही समस्या लक्षात घेता सौ. शिल्पा खोत, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, पर्यटन व्यावसायिक गौरव ओरसकर, तनिष्का कासवकर, तुषार कासवकर, चिंदरकर, बागवे यांसह अन्य पर्यटन व्यावसायिक यांनी मालवण नगरपरिषदेवर धडक देत जाब विचारला.

यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, वादळी सदृश्य परिस्थिती असल्याने जलक्रिडा किंवा किल्ला दर्शन पर्यटकांना अनुभवता येत नाही. त्यामुळे आलेला पर्यटक हा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डनला येतो. मात्र रॉक गार्डन गेले अनेक दिवस काळोखात आहेत. तसेच आजपासून काही दुरुस्ती कामासाठी रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे. ही बाब समजल्यावर पर्यटकांना सुविधा मिळाव्यात तसेच पर्यटन व्यावसायिकांचा विचार करता त्यांच्या न्याय हक्कासाठी मालवण नगरपरिषदचे लक्ष वेधण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.

सध्या रॉक गार्डन बंद असा कोणताही बोर्ड बाहेर न लावता तांत्रिक बिघाड आहे तो त्वरित सुरळीत करुन रॉक गार्डन खुले करावे. जेणेकरून आलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य नगरपालिकेला केले जाईल. मात्र पर्यटकांना तसेच पर्यटन व्यवसायिकांना कोणताही त्रास व समस्या निर्माण होता नये, अशी भुमिका यावेळी शिल्पा खोत यांनी मांडली.

स्थानिक व्यवसायिक तनिष्का कासवकर, गौरव ओरसकर यांनीही रॉक गार्डन येथील असुविधांबाबत भुमिका मांडली. गेली कितीतरी महिने व्यवसाय नसल्याने समस्या आहेत. रॉक गार्डन मधील म्युझिकलं फाउंटन बंद असून अन्य खेळण्यांचे प्रकार मोडकळीस आल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करतात. पर्यटकांच्या नाराजीला पर्यटन व्यावसायिकांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टींचा व्यवसायावर परिणाम होत आहे. काल रात्री रॉक गार्डनला लॉक घालण्यात आले. तरी नगरपरिषद प्रशासनाने यासाठी त्वरित उपाययोजना करुन लवकरात लवकर रॉक गार्डन सुरळीत सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली.

You cannot copy content of this page