देशभरातील तज्ञ, संशोधक आणि निसर्गप्रेमींचा सहभाग..
बांदा/प्रतिनिधी
पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी येत्या २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आंबोली येथे ‘बायोडायव्हर्सिटी मीट’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. गेली २० वर्षे निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत असलेल्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’ या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मेळाव्यात देशभरातील नामवंत वक्ते, संशोधक आणि निसर्गप्रेमी सहभागी होणार असून, निसर्ग संवर्धनाविषयी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व – केदार भिडे,
उभयचर प्राणी – के. व्ही. गुरुराज (बेंगलोर),
वन्यजीव व वन अपराध – रोहन भाटे,
पक्षी व त्यांचे जीवन – पराग रांगणेकर (गोवा),
फंगी म्हणजेच बुरशी – शीतल देसाई,
वन्यप्राणी – गिरीश पंजाबी,
वनसंवर्धन आणि वनांविषयी प्रश्न – भाई केरकर (गोवा),
फुलपाखरू व पतंग – हेमंत ओगले व मिलिंद भाकरे,
वनस्पती – मिलिंद पाटील,
वटवाघूळ – राहुल प्रभू खानोलकर,
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून निसर्गातील घडामोडी मांडण्याच्या पर्यायांवर रमण कुलकर्णी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या तीन दिवसांच्या उपक्रमांतर्गत तज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती, आणि विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांसाठी रात्रीच्या सत्रात कोकणातील लोककलेचे दर्शन — दशावतार नाटकाचे सादरीकरण देखील ठेवण्यात आले आहे. स्थानिकांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार असून, निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी काका भिसे (आंबोली) – 75884 47161 किंवा राजेश देऊळकर – 97655 75690 यांच्याशी संपर्क साधावा. या mnccamboli2016@gmail.com या ईमेलवर सविस्तर माहिती पाठवा.
