दीक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघात निवड..
कुडाळ : एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे दि. १४- १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमला कडवी लढत दिली पण तिला पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर संधान मानावे लागले. दरम्यान दीक्षाची ग्वालियर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून १६० पेक्षा अधिक खेळाडूंनी तर सिंधुदुर्गच्या १२ खेळाडूंनी सहभाग घेतला. २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमला कडवी टक्कर दिली. तीन सेट पर्यंत रंगलेल्या या लढतीत दिक्षाला १५ – १६, १८ – ०५, ०४ – २१ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर दिक्षा चव्हाणवर वरचढ ठरली.
राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
सिंधुदुर्गच्या दिक्षा चव्हाणची १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्वालियर , मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिचे सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम परिवारातर्फे अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा!
