महाविकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा…

निशांत तोरसकर: शहराच्या विकासात सत्ताधारी आमदार त्यांच लोकप्रतिनिधी अपयशी..

⚡सावंतवाडी ता.०९-:
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा हक्क असावा, यासाठी आम्ही आघाडीसमोर ठोस मागणी केली आहे. या बाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, जर आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे, अशी माहिती शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, इतर पक्षातील काही कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. पण, शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत असलेल्या आणि शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींनाच पक्षात प्रवेश देण्यात येईल. योग्य वेळी त्यांच्या प्रवेशाबाबत घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीतील शासकीय रुग्णालयाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत, नागरिकांना उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथे जावे लागते. शहरात रोजगाराच्या संधींचा अभाव असल्याने युवक चुकीच्या मार्गाने जात आहेत.तसेच नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे सगळे स्थानिक सत्ताधारी, आमदार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.“जनता आता या अपयशाला कंटाळली आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते निश्चितच योग्य उत्तर देऊन महाविकास आघाडीतील शिवसेनेला साथ देतील,” असा विश्वास तोरसकर यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणूक घोषवाक्य आणि भविष्यातील योजनाशिवसेना आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती व शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यांवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षातील काही नेते पैशाच्या जोरावर निवडून येऊ शकतो असे समजतात, पण “त्यांचा भोपळा लवकरच फुटणार आहे,” अशी टीका तोरसकर यांनी यावेळी केली.तसेच नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे अनेक सक्षम चेहरे आहेत आणि योग्य वेळी त्यांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी शैलेश गवंढळकर, उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार, सुभेदार, श्रुतिका दळवी, समीरा खालील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page