एन. एस. राघव:एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन तर्फे बिबवणे विद्यालयात सुसज्ज सभागृह..
⚡कुडाळ ता.०४-: विद्यार्थी हा देशाचे भवितव्य असतो. त्याला चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण मिळाले, तर त्याच्या हातून भविष्यात राष्ट्र निर्माणाचे प्रभावी कार्य होऊ शकते. म्हणूनच भारतीय आयुर्विमा महामंडळ देशाच्या नागरिकांचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम करतानाच शिक्षणासारख्या पवित्र कार्यात राष्ट्र निर्माणासाठी गुंतवणूक करीत असते. बिबवणे सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचे पवित्र कार्य होत असताना येथील विद्यार्थ्यांना सुसज्ज सभागृह बांधण्याचे संस्थेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करताना भारतीय आयुर्विमा महामंडळाला विशेष आनंद आहे. कारण ही गुंतवणूक राष्ट्राच्या भविष्यासाठी आहे,असे प्रतिपादन भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम विभागाचे रिजनल मॅनेजर एन. एस. राघव यांनी काढले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशनच्यावतीने ५० लाख रु.च्या आर्थिक सहाय्यातून बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ (बिबवणे ) या संस्थेने उभारलेल्या लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नवीन सुसज्ज सभागृहाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा संस्थेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सभागृहाचे उद्घाटन एन. एस. राघव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री राघव बोलत होते.व्यासपिठावर आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक चंद्रप्रकाश पराते, विपणन प्रबंधक अभय कुलकर्णी, सेल्स मॅनेजर गजानन कोषटवार, विक्रय प्रबंधक प्रवीण वरुटे, कुडाळ वरिष्ठ शाखा प्रबंधक हेमंत जोशी, ओरोस शाखा प्रबंधक सुहास गवाणकर, सावंतवाडी शाखा प्रबंधक दिपक कोळी, कुडाळ सहाय्यक शाखा प्रबंधक वरुण सामंत, विकास अधिकारी उन्मेश शेटये, रोहन पोखरणकर, सचिन माने आदी अधिकारी तसेच बिबवणेच्या सरपंच सृष्टी कुडपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. राघव म्हणाले, भारतीय जीवन विमा निगम ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीने भारतीयांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम करतानाच राष्ट्राच्या उभारणीमध्येही सहभाग देत आहे. राष्ट्र निर्माणाच्या अनेक प्रकल्पामध्ये भारतीय आयुर्विमा महामडळाने योगदान दिले आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पुढाकार राहिला आहे. शिष्यवृत्ती देऊन गुणवत्तेला प्रोत्साहन दिले जाते. संस्थेने उभारलेल्या या सभागृहात आपल्या अंगभूत गुणांचा विकास करा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. चंद्रप्रकाश पराते, अभय कुलकर्णी, गजानन कोषटवार यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
संस्थाध्यक्ष राजाराम सावंत म्हणाले, बिबवणे पंचक्रोशी हा ग्रामीण भाग आहे. मात्र, गुणवत्ता अफाट आहे. या गुणवत्तेला सुसज्ज आणि अद्ययावत भौतिक सुविधांची गरज आहे. या गरजेतून सुसज्ज सभागृह व वर्गखोल्या असलेली इमारत उभारणीचा संकल्प केला. ग्रामीण भागातल्या संस्थेसाठी असा संकल्प पूर्ण करणे अशक्यप्राय वाटत असताना आयुर्विमा महामंडळाने आर्थिक सहाय्याचा हात पुढे केल्यानेच सभागृहाचे स्वप्न साकार करु शकलो. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचे योगदान आमच्या विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या या पिढ्यांना सर्वांगीण विकासाचे बळ देत राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. चंद्रप्रकाश पराते, अभय कुलकर्णी, गजानन कोषटवार यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रारंभी राजाराम सावंत यांच्या हस्ते एन.एस. राघव व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी यांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. या उद्घाटन समारंभाला संस्था पदाधिकारी, संचालक, पालक शिक्षक संघाचे सदस्य, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश कुबल यांनी, सूत्रसंचालन कुडाळ शाखा वरीष्ठ सहाय्यक मुकुंद चौधरी व विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अंकुश कदम यांनी, तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर पारधी यांनी मानले.
