भास्कर परब यांचा सवाल:गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन..
कुडाळ : झाराप तिठा येथील अपघातात एका युवकाचा बळी गेला. त्याबाबत जाब विचारला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रासिटी गुन्हा दाखल होत असेल तर हायवे अधिकारी श्री. साळुंखे यांच्या वर सुद्धा मनुष्य वधाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे. यासाठी झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ लवकरच पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहेत. तरीही गुन्हा दाखल झाला नाही, तर पुन्हा यासाठी झाराप तिठा येथे जन आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा तेर्सेबाबर्डेचे माजी सरपंच भास्कर परब यांनी दिला आहे.
भास्कर परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, झाराप तिठा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताला नॅशनल हायवे अधिकारी श्री. साळूंखे हेच जबाबदार आहेत. साळुंखे हा अधिकारी एवढा निगरगट्ट आहे की या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झाराप तिठा येथे आतापर्यंत सात ते आठ लोकांचे नाहक जीव गेले आहेत म्हणण्यापेक्षा नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत. याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला म्हणून ॲट्रासिटी गुन्हा दाखल करणे योग्य नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाला एका युवकाच्या गेलेल्या प्राणापेक्षा ॲट्रासिटी महत्वाची वाटली. व्वा सुंदर कारभार आहे पोलीस प्रशासनाचा !
झाराप तिठा येथे माजी आमदार वैभव नाईक आले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी श्री. साळुंखे यांना उपस्थित शेकडो ग्रामस्थांच्या समोर जाब विचारला हे पण सत्य आहे. पण जातीवाचक शब्दांचा उल्लेख वैभव नाईक यांनी केला नाही. त्यावेळी पोलीसही त्याठिकाणी उपस्थित होते, मग ॲट्रासिटी गुन्हा का?
मी नॅशनल हायवेच्या अनागोंदी कारभाराबाबत पाच वर्षांत अनेक निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या निवेदनाना या साळुंखे अधिकाऱ्याने कचऱ्याची टोपली दाखवली. झाराप तिठ्यावर वारंवार अपघात होतात म्हणून त्याठिकाणी हॉटेल राज येथे ज्या प्रकारे रंबलर स्पीड ब्रेकर बसविले त्याच पद्धतीचे रंबलर झाराप तिठा येथे बसविण्यात यावेत, अशा मागणीचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन चार महिन्यांपूर्वी मी दिले होते आणि त्यानंतर अनेक वेळा संपर्क साळुंखे यांना केला. त्यावेळी ते सांगायचे वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्या निवेदनानुसार मागणी केली आहे. तिकडून मंजूरी आली की बसवतो, असे वारंवार सांगण्यात आले. पण पूर्तता नाह.
दोन दिवसांपूर्वीच्या अपघातात महामार्ग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा नाहक बळी गेला, म्हणून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महामार्ग दोन तास रोखला. वैभव नाईक यायच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांना येथे पाचारण करा त्या प्रमाणे साळुंखे आले. त्यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी साळुंखे व पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी साळुंखे मान खाली घालून निपचित उभे होते. ग्रामस्थांचा रोष बघून पोलीसांनी साळुंखे यांना बाजूला नेल. नाहीतर वैभव नाईक यायच्या अगोदरच ग्रामस्थांचा साळुंखेनी मार खाल्ला असता. त्यानंतर हा मिडल कट तात्काळ बंद करून रंबलर बसवावा, ही मागणी लावून धरली. त्यावेळी साळुंखे यांनी तात्काळ मिडलकट बंद करून रंबलरही बसविले. मग यावेळी कुठे गेली वरिष्ठ कार्यालयाची मंजूरी?
अशा या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच झाराप येथील अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच साळगाव येथील युवाकाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत वैभव नाईक यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला म्हणून पोलिस अधिकारी कुठलीही शहानिशा न करता ॲट्रासिटी दाखल करण्यात कार्यतत्परता दाखवून आपली जबाबदारी पार पाडत असतील तर झाराप तिठा येथे नॅशनल हायवे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे आतापर्यंत सात आठ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांची जबाबदारी घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा एक तरी गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले का ॽ महामार्ग अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच लोकांचे जीव जात आहेत. याबाबत त्या अधिकाऱ्याला जाब विचारणे चूक आहे का ॽ यांचे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने जनतेला दिले पाहिजे. जर जाब विचारला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल होत असेल तर झाराप तिठा येथे आतापर्यंत सात आठ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे त्यामुळे नॅशनल हायवेचे सध्याचे जबाबदार अधिकारी साळुंखे यांच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे होता. पण ते करण्याचे धाडस प्रशासन करण्याचे सोडून अपघातात एका युवकाचा बळी गेला त्याबाबत जाब विचारला म्हणून ॲट्रासिटी गुन्हा दाखल होत असेल तर साळुंखे यांच्यावर सुद्धा मनुष्य वधाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे, यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ लवकरच पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहोत. तरीही गुन्हा दाखल झाला नाही तर पून्हा यासाठी झाराप तिठा येथे जन आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा तेर्सेबाबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी दिला आहे.
