⚡मालवण ता.३०-:
केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची मुदत आता ३१ मार्च, २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालवण शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाडी चालक आणि रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांनी -पुढे यावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेने केले आहे.
या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता प्रथम १०,००० रुपयांऐवजी १५,००० रुपये आणि दुसऱ्यावेळी २० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ५०,००० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘लोककल्याण मेळावा’ विशेष मोहीम राबवली जात आहे. या मेळाव्यात नवीन अर्ज स्वीकारणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी मार्गदर्शन करणे, अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन, लाभार्थ्यांचे प्रोफायलिंग करून शासनाच्या इतर योजनांचाही लाभ देणे आदी कामे होतील. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
