३६ तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा होणार विकास

कामाना प्रशासकीय मान्यता पावणे चार कोटी निधी उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी ता ०७ जिल्हावार्षिक याेजनेतून क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास व तीर्थक्षेत्र सुशाेभीकरणाच्या ३६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ३ काेटी ७५ लाख रुपये निधीची तरतूद असल्याची माहिती बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी वित्त समिती सभेत दिली. जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे , सदस्य संतोष साटविलकर, नितीन शिरोडकर , अनघा राणे , नागेंद्र परब , गणेश राणे, जेराॅन फर्नांडिस आदीसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. आजच्या वित्त समिती सभेत सदस्य नितीन शिरोडकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी घाेडेमुख देवस्थान चे काम सुचविण्यात आले होते . त्या कामाची आजची स्थिती काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास व तीर्थक्षेत्र सुशोभीकरणाच्या जिल्ह्यातील ३६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ३ काेटी ७५ लाख रुपये निधीची तरतूद असल्याची माहिती बांधकाम कार्यकारी अधिकारी अनामिक जाधव यांनी सभेत दिली. देवगड तालुक्यातील माेंड ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेशन कार्यरत नसताना या ग्रामपंचायतीकडून डाटा एंट्री ऑपरेटर च्या मानधन व इतर खर्चासाठी एक रकमी भरून घेतलेल्या रकमेचे काय झाले ? असा प्रश्न सदस्य गणेश राणे यांनी उपस्थित केला असता ही भरून घेतलेली रक्कम सुरक्षित जमा आहे . मात्र ती आता परत करता येणार नाही. मात्र संबंधित ग्रामपंचायतीने डाटा ऑपरेटर नियुक्त केल्यास या रकमेतून त्याचे मानधन काढले जाईल, अशी माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात १६ एप्रिल रोजी बैठक घेऊन तज्ञ समिती नेमून जिल्हा परिषद उत्पन्न वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद विभाग प्रमुखांना उत्पन्न वाढीच्या दृष्टीने उपायोजना सुचविण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद आवारात व्यापारी गाळे बांधून त्यावर प्रशस्त सभागृह बांधण्याबाबत चर्चा झाली तर जिल्हा परिषद आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यासाठी सर्वांच्या मान्यतेने जागा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.

You cannot copy content of this page